
मुंबई | Mumbai
दहा दिवसांच्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत वेळ दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या तारखेवरुन मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेल्या मुदतीसंदर्भात विधान केले. “२ जानेवारीपर्यंत दोन महिन्यांचा वेळ मिळाला आहे. त्यात दोन महिन्यांत बरंचसे काम पूर्ण केले जाईल. ठरवलेले काम नक्की होईल. त्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सरकार लावेल”, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सर्वांच्या समक्ष ठरले आहे. तेच म्हणाले की २४ डिसेंबर पर्यंत समीतीला वेळ दिलेला असून गायकवाड साहेबांचा शब्द आम्ही मानला. बच्चू कडू साक्षीदार असून ते म्हणाले की २४ डिसेंबरपर्यंत तरी वेळ दया. मात्र बोलण्यात ऐकण्यात फरक झाला असावा पण त्यात फार जास्त काही नाही सात-आठ दिवसांचा फरक आहे. पण खरे बोलयाचे झाले तर २४ डिसेंबर तारीख ठरली आहे. तेवढा वेळ पण देणार नव्हतो, पण त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला आत घेतले आहे. सर्वांचे कल्याण होणार आहे म्हणून २४ डिसेंबरची तारीख दिली.
"सर्वांना आरक्षण मिळणार असल्याने समाधानी आहे. ३५ वर्षे आरक्षण नव्हते तेव्हा बसूनच होतो. आरक्षण मिळावे म्हणून समिती काम करत आहे. समितीचे संख्या वाढवण्यास सांगितले आहे. मात्र तोपर्यंत नोकरभरती करायची नाही. जर नोकरभरती केली तर आमच्या जागा राखीव ठेवणार असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. वेळ दिला तरच आरक्षण मिळेल नाहीतर फक्त मराठवाड्यातील लोकांनाच याचा फायदा होईल," असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच जात पडताळणीसाठी आता राज्य मगासवर्ग आयोगाचे आदेश लगेच लागू होणार आहेत. त्यामुळे ती अडचण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
“सरकारवर विश्वास आहे. त्यांनी वेळ घेतली आहे. पण आम्ही कधीपर्यंत दम धरायचा? आता त्यांनी आरक्षण नाही दिलं तर मात्र सरकारला जड जाईल. मुंबईत जायची वेळ येणार नाही. पण आली तर मी जाणारच. मग ते सरकारला परवडणार नाही. आंदोलन शांततेतच होईल, पण मग आम्ही ताकदीने जाणार. आरक्षण दिले नाही तर मुंबईच्या पूर्ण नाड्या बंद करून टाकीन मी”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.