महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फडणवीसांची टीका

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारने जाहीर केल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली
महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फडणवीसांची टीका

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारने जाहीर केल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे शोधले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. परंतु, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा आणि फसवणूक केली आहे. किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच आहे, आता सरकारही सूड घेत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याचे १० हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
तसंच एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचे बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.


रस्ते- पूल - 2635 कोटी
नगर विकास - 300 कोटी
महावितरण ऊर्जा - 239 कोटी
जलसंपदा - 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा - 1000 कोटी
कृषी-शेती-घरासाठी - 5500 कोटी

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, एकूण केंद्राकडून येणे ३८ हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपय प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

-फळबागासाठी प्रति हेक्टरी २५ हजार मदत दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे.

- पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com