Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याविधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; 'या' दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार

विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; ‘या’ दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना झालेल्या अटकेनंतर विरोधी पक्षाकडून होत असलेली त्यांच्या राजीनाम्याची मागणी, सत्ताधारी आघाडीने मलिक यांची केलेली पाठराखण, केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असलेले आघाडीचे नेते, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान, भाजप नेत्यांकडून ठाकरे कुटुंबावर होणारी टीका या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राजकीयदृष्ट्या कमालीचे वादळी ठरणार आहे….

- Advertisement -

विधानसभेचे अध्यक्षपद गेले वर्षभर रिक्त आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची तयारी आघाडीने केली आहे. मात्र, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध तणावाचे असल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक ९ मार्चला व्हावी, असा प्रस्ताव सरकारने राजभवनला पाठवला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अधिवेशनात ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपींकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपावरुन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर आघाडीचे घटक पक्ष ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. भाजपनेही रस्त्यावर उतरून ईडीच्या कारवाईचे समर्थन करीत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मात्र, आघाडीने मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत भाजपची मागणी फेटाळली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिवेशनात सुरुवातीला गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (MP Kirit Somaiya) यांनी ठाकरे कुटुंबावर आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सोमय्या पिता- पुत्रांना अटक होणार असल्याचे जाहीर केले होते.

तसेच राऊत यांनी मोहित कंबोज यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू असताना मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या. या सततच्या धाडींबद्दल उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा आपल्या शैलीत समाचार घेतला होता. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच औरंगाबादच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने राज्यपालांच्या माफीची मागणी केली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषणावेळी आघाडीच्या आमदारांकडून घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे.

११ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

राज्याचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होणार आहे. एप्रिल- मे महिन्यात मुंबई महापालिकेसह अन्य महत्वाच्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात शहरी भागासाठी महत्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या