महाराष्ट्राचे महसूलमंत्री राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना का भेटले?

jalgaon-digital
2 Min Read

हमदनगर / नवी दिल्ली –

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मंगळवारी सकाळी जयपुर पोहचले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची त्यांनी भेट घेतली.

महसूलमंत्री थोरात यांनी आज राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली. गेहलोत यांच्या निवासस्थानी उभयतांची बैठक झाली. अलिकडेच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरून पक्षात दोन गट पडले आहेत. पक्षाने यावर तात्पूरता पडदा टाकला असला तरी पडद्याआड अनेक घडामोडी सुरू आहेत. गेहलोत आणि थोरात हे गांधी परिवाराचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीच नेतृत्व करावं आणि त्यांनाच अध्यक्ष केलं जावं, अशी मागणी ना.थोरात यांनी केली होती.

तर गेहलोत हे देखिल गांधी परिवाराच्या नेतृत्वावर ठाम आहेत. मात्र पक्षातील 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेस नेतृत्वही सावध झालं आहे. पत्र लिहिणार्‍या नेत्यांनी नंतर याबाबत खुलासा केला. पक्षाने सारवासारव केल्यानंतर प्रकरण थंडावल्याचे म्हटले गेले. मात्र या नेत्यांनी पुन्हा एक बैठक घेतली. त्यात महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे, असेही म्हटले जाते.

सोबतच गांधी परिवाराचे निष्ठावंतही सरसावले आहेत. त्यामुळे थोरात-गेहलोत भेट त्यादृष्टीने पाहिले जात आहे. पक्षाने महाराष्ट्रात सरकारमध्ये पक्षाचे नंबर एक मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद अशी दोन्ही महत्त्वाची पदे थोरात यांच्याकडे दिली आहेत. अधूनमधून राज्यातही आमदार आणि नेते नाराज असल्याच्या चर्चा झडतात. तर गेहलोत यांनी सचिन पायलट यांचे बंड मोडीत काढत सरकार सुरक्षित केले आहे.

त्यामुळे ना.थोरात यांनी घेतलेल्या भेटीबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय पक्ष नेतृत्व आणि अस्थिर स्थितीत काय करावे, याबाबत त्यांच्यात चर्चा झाली असावी, असे म्हटले जाते. पक्ष संघटनेत दोन्ही नेते एकमेकांचे समर्थक व मित्र मानले जातात.

दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याचे प्रसिद्धी कार्यालयाने म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *