
नाशिक | Nashik
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतील बंडांनंतर शरद पवार यांनीही मैदानात उतरत दंड थोपटले असून आज त्यांची पहिली सभा येवल्यात होत आहे.
दरम्यान येवला येथे सभेला जाताना शरद पवार यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. यादरम्यान पावसानेही हजेरी लावली. यावेळी पावसाची पर्वा न करत पवार कार्यकर्त्यांना भेटले. यामुळे त्यांचा शर्ट चिंब होऊन अंगाला चिकटला. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
"भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं ना थका हूँ ना हारा हूँ रण में अटल तक खडा हूॅं मैं" असं कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो शेअर केला आहे.
का होत आहे फोटोची चर्चा?
२०१९ च्या निवडणुकीदरम्यान साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भाषण देत असताना अचानक पावसाने हजेरी लावली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, पावसात भाषण केलं. त्यानंतर राज्यात या सभेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगू रंगली होती. इतकेच नाही, तर शरद पवार यांचे या सभेचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. तसेच निवडणुकीतील यशाचे श्रेय पवार यांच्या पावसात भिजण्यालाही देण्यात आले होते. आता येवल्यात शरद पवार हे पुन्हा एकदा पावसात भिजले आहेत. या निमित्ताने त्यांच्या भिजण्याची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.