
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीनं सोमवारी तब्बल 9 तास चौकशी केली. IL&FS घोटाळ्याप्रकरणी ईडीनं जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला. महत्त्वाचं म्हणजे, ईडीनं काही कागदपत्रं देखील मागवली होती, मात्र जयंत पाटलांनी ती सोबत नेली नव्हती. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, ईडी चौकशीविरोधात राज्यभराती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दरम्यान राज्यभरातून अनेक नेत्यांचे फोन आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोन संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले, मला राज्यातून सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले. आज सकाळीही अनेकांचे फोन आले. यावेळी माध्यमांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, त्यांचा मला फोन आलेला नाही. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान एकीकडे सोमवारी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशा सुरु असताना राज्यभरात त्यांचे समर्थक निदर्शने करत होते. तर दुसरीकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची चौकशी सुरु असताना देखील बडे नेते हे गायब असल्याचं दिसून आलं होत. यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशी सुरु झाली तेव्हा सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि राज्यभर आंदोलनं झाली.
असं असलं तरी प्रदेश कार्यालय आणि इतर ठिकाणी कुठलेही आमदार दिसून आले नाही. इतकेच नाही तर जे मोठे नेते आहेत, ते देखील दिसले नाहीत. यातच जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे हे जयंत पाटीलांच्या समर्थानात दिसले. मात्र इतर नेते त्यांच्या समर्थानात दिसले नाही. यामुळे राष्ट्रवादीमध्ये गटबाजी सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.