Thursday, April 25, 2024
Homeराजकीयएकनाथ खडसेंकडून सस्पेन्स कायम

एकनाथ खडसेंकडून सस्पेन्स कायम

जळगाव –

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील जामनेर येथे होणार्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत

- Advertisement -

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. फडणवीस यांच्यासोबत उपस्थित राहणार की नाही याबाबत उत्सुकता राहू द्या, आताच सगळे सांगून कसे चालेल, असे वक्तव्य खडसे यांनी या कार्यक्रमाबद्दल व्यक्त केले.

गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे असलेले एकनाथ खडसे हे शनिवारी रात्री उशिरा जळगावात परतले. त्यानंतर रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र काही मुद्द्यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

सस्पेन्स कायम –

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार 13 ऑक्टोबर ला होणार असून या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. एकीकडे गेल्या महिन्यात एकनाथराव खडसे यांनी फडणवीस यांचे नाव घेत थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडीत गेल्या चार दिवसांपासून खडसे हे मुंबई येथे होते. यादरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे मंगळवारी जामनेर येथे फडणवीस यांना एकनाथराव खडसे हे भाजपचे नेते म्हणून भेटतील की तोपर्यंत राष्ट्रवादी मध्ये जातील, अशीही उत्सुकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपल्याला निमंत्रण पत्रिका आहे की नाही हे पहावे लागेल असे खडसे यांनी शनिवारी सांगितले होते. त्यानंतर रविवारी याविषयी त्यांना विचारले असता सर्वच आता सांगून टाकले तर कसे चालेल, उत्सुकता राहू द्या, असे सांगितले. त्यामुळे एका दिवसावर आलेल्या या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार की नाही याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लपून-छपून भेटणार नाही –

मुंबई येथे शरद पवार यांच्या भेटीबाबतच्या चर्चेबद्दल विचारले असता खडसे म्हणाले शरद पवार यांनी याबाबत सांगितले आहे. मला भेटायचे असेल तर मी उघड-उघड भेटेन, लपून-छपून जाणार नाही.

पक्षातून मीडिया ढकलत असल्याबाबत प्रदेशाध्यक्षांना विचारा –

खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेबद्दल मीडीया खडसे यांना पक्षातून बाहेर ढकलत आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याबद्दल खडसे म्हणाले, मीडिया ढकलत आहे की नाही याविषयी त्यांनाच विचारा, असे उत्तर दिले. त्यामुळे खडसे यांचा कुणाकडे अंगुली निर्देश आहे हेदेखील या विधानावरुन स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या