
मुंबई | Mumbai
मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईच्या कायापालट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपुजन आज करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला, कोणाचे लग्न झाले तरी माझ्यामुळेच झाले, नोकरी लागली तरी माझ्यामुळेच लागली. एखाद्याला सवयच असते काहीही केले तरी मीच केले म्हणतात. अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
तसेच, दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत नाही. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे. 25 वर्ष राज्य करूनही रस्ते दुरुस्त करता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये खड्डेमुक्त मुंबई होणार. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकते तर 25 वर्ष राज्य करणाऱ्यांना सवाल का विचारू नये? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.