अनिल देशमुख यांनी का घेतली शरद पवार यांची भेट?

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

मुकेश अंबानी प्रकरणावरून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. अनिल देशमुख हे पवार यांच्या भेटीला गेल्याचे वृत्त येताच महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान,

या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी राजीनाम्याबाबतच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. गृहमंत्री बोलतांना म्हणाले की, ‘विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांसोबत चर्चा करण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाची माहिती दिली. त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर, मुंबईत सध्या घडत असलेल्या घडामोडींची पवार साहेबांसोबत चर्चा झाली. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली,’ असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच ‘एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आम्ही करत आहोत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल,’ अशी ग्वाही देशमुखांनी दिली आहे.

दरम्यान, माध्यमांनी अनिल देशमुख यांना मुंबई पोलीस आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदलीच्या विषयावर विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्याचं गृहमंत्र्यांनी टाळलं. मुंबई पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन नाही. चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या अक्षम्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला की, चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी त्यांना बाजूला केलं असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *