Friday, April 26, 2024
Homeराजकीयकठोर निर्बंध आणि आर्थिक पॅकेजवरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

कठोर निर्बंध आणि आर्थिक पॅकेजवरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुंबई | Mumbai

राज्यात कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. संचारबंदीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून राज्यात राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर करतांना विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले असून त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई- पुणे या व्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, ‘मुंबई आणि पुणे ही महत्त्वाची शहरं आहेतच आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण मुंबई- पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळं नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून काहीच कृती होताना दिसत नाहीये. गेल्यावेळीही नागपूरला कोणतीही व्यवस्था केली नाही, आजही नागपूरती स्थिती वाईट आहे. म्हणूनच मी आज नागपूरला आलो आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

तसेच ‘ऑक्सिजनचं व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी होत असून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे,’ याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं आहे. राज्य सरकारला ऑक्सिजनच्या वाहतुकीचे व्यवस्थापन जमत नाही. सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धुळफेक आहे. याचं कारण म्हणजे ३३०० कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली ते नियमित बजेटमधील तरतूद आहे. जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळं सध्या वाढणाऱ्या करोनासाठी ही तरतूद नाही,’ अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन नाही हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचं जर वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये’, असं नाना पटोले यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

तसेच, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली आहे. ‘आज राजकारणापलीकडे जाऊन लोकांचा जीव वाचवणं हे सगळ्यांचं कर्तव्य असलं पाहिजे. देशात सगळ्याच राज्यांमध्ये करोना पसरू लागला आहे. आणि देशाचे पंतप्रधान काय करत आहेत? त्यांना निवडणुकांचं पडलं आहे. विनामास्क प्रचार करून ते काय संदेश देत आहेत? एकीकडे मास्क घाला असं सांगतात आणि स्वत: पंतप्रधान प्रचारात मस्त आहेत आणि जनता करोनाने त्रस्त आहे. लोकांचा जीव जातोय. ज्याचं जळतं, त्याला कळतं. अनेक परिवारांमध्ये करोनामुळे कर्ते लोकं मरण पावले आहेत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आहेत. त्या अश्रूंवर कुणी राजकारण करू नये, असा आमचा त्यांना सल्ला आहे’, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

त्याचबरोबर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली,’ असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसेच, ‘राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते, त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत.’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या