गावित म्हणजे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ

राजकारण न करता एकत्रित लढा देवूया : चंद्रकांत रघुवंशी
गावित म्हणजे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

गावित म्हणजे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ आहे. त्यामुळे स्वतः भ्रष्टाचारी असतांना दुसर्‍यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करु नये,

करोनाचे राजकारण न करता एकत्रितरित्या लढा दिल्यास निश्‍चितच संकटावर मात करता येईल, असे आवाहन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील एक हजार रेमडिसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांनी रोटरी वेलनेस सेंटरला बेकायदेशीररित्या वाटप केल्याचा पुनरुच्चार खा.डॉ.हीना गावित यांनी करत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत श्री.रघुवंशी बोलत होते.

खा.डॉ.हीना गावित यांनी रेमडेसिविर वाटपात माजी आ.रघुवंशी यांच्यावर आरोप करतांनाच त्यांचा रॉकेलचा भ्रष्टाचार काढला. याबाबत श्री.रघुवंशी म्हणाले, गावित कुटूंबावर आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराचे अनेकदा आरोप झाले आहेत.

आजही विविध प्रकरणांमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकश्या सुरु आहेत. त्यामुळे स्वत: भ्रष्टाचाराचे विद्यापीठ असतांना इतरांवर आरोप करण्यापूर्वी स्वत:च्या कुटूंबातील भ्रष्टाचाराच्या चौकशाही खा.डॉ.गावितांनी आठवाव्यात.

जर मी कोणत्याही चौकशीत दोषी आढळलो तर माणूसकीच्या नात्याने नंदुरबारात फिरणार नाही, असेही माजी आ.रघुवंशी म्हणाले.

श्री.रघुवंशी म्हणाले, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक हे चारही अधिकार्‍यांनी सुयोग्य नियोजन करुन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

त्यामुळे गेल्या आठवडयापासून कोरोनावर बर्‍यापैकी दिलासादायक नियंत्रण आले आहे. मात्र, कोरोनाच्या या कठीण काळात खा.डॉ.हीना गावित यांच्याकडून राजकारण होणे ही दुर्देवी बाब आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या काळात सर्वाधिकवेळा जिल्हाधिकार्‍यांना खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित हेच दिसतील. त्यांचे जिल्हाधिकार्‍यांशी चांगले संबंध असतांना जिल्हाधिकार्‍यांच्या विरोधात ते का जात आहेत, असा प्रश्‍न पडतो.

कदाचित जिल्हाधिकारी हे आदिवासी समाजाचे असून चांगले काम करत असल्याने खासदारांना ते प्रतिस्पर्धी वाटू लागले असावेत. गेल्या वर्षभरापासून रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून सुमारे सहा हजारावर रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप केले.

यात एक हजार इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांनी उसनवारी तत्वावर जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध करुन दिले. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिल्यानंतर रेमडेसिविर उपलब्ध झाले.

सदर इंजेक्शन ५ लाख ९४ हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर रोटरी वेलनेस सेंटरकडे सोपविण्यात आले. ५९४ रुपयांचे इंजेक्शन आम्ही ५५० रुपयांत गरजू रुग्णांना विक्री केले. आम्ही ४४ रुपये तोटा सहन करुन वाटप केले, यात भ्रष्टाचार कसा होणार.

त्यातल्या त्यात आता ८९९ रुपये इंजेक्शनची किंमत असेल तर जिल्हा रुग्णालयाला ९ लाख रुपयांचे इंजेक्शन खरेदी करुन द्यावे लागणार आहे, नंदनगरीच्या जनतेसाठी हा तोटा सहन करण्याची आमची तयारी आहे, असेही श्री.रघुवंशी म्हणाले.

श्री.रघुवंशी म्हणाले, डॉ.हीना गावित यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यापूर्वी डॉ.तात्याराव लहाने यांच्या माध्यमातून जिल्हाभर शिबिरे घेतली.तात्याराव लहानेंमुळे डॉ.हीना गावित या डॉक्टरही झाल्या आणि खासदारही झाल्या. मात्र, खासदार झाल्यानंतर त्यांनी एकही शिबीर घेतले नाही, हे विशेष.

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा तुटवडा आहे. कार्यरत डॉक्टरांवर ताण येत आहे. खा.डॉ.हीना गावित व त्यांच्या भगिनी दोन्ही डॉक्टर आहेत. त्यांनादेखील कठीण काळात जिल्हा रुग्णालयात सेवा देता आली असती मात्र तसे त्यांनी केलेले नसल्याचेही रघुवंशी म्हणाले.

श्री.रघुवंशी म्हणाले, खा.डॉ.हीना गावित यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच डॉ.सुभाष भामरे यांनाही संसदरत्न पुरस्कार मिळाला. यामुळे सर्व संसदरत्न नेमके खान्देशातच कसे?

असा सवाल उपस्थित करीत रघुवंशी यांनी दिल्लीत एखाद्या संस्थेकडून मिळणार्‍या संसदरत्नापेक्षा आदर्श शिक्षक, आदर्श तलाठी, आदर्श ग्रामसेवक असे पुरस्कारदेखील बहुमोलाचे असल्याचा टोला रघुवंशी यांनी लगावला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com