Thursday, April 25, 2024
Homeराजकीयविधानपरिषद निवडणूक : नंदुरबार-धुळे जिल्ह्यात सरळ लढत

विधानपरिषद निवडणूक : नंदुरबार-धुळे जिल्ह्यात सरळ लढत

नरेंद्र बागले – शहादा :

करोनामुळे लांबणीवर पडलेली विधानपरिषद निवडणूक दिवाळीच्या आतषबाजीनंतर लागलीच जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत धुळे-नंदुरबार जिल्ह्यात सरळ लढत असली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आपला उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान मात्र कायम आहे.

धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांना आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.

धुळे नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर निवडणूक जाहीर करण्यात आल्यामुळे 1 एप्रिल 2020 ला होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली होती.

माघारीनंतर भाजपतर्फे अमरीशभाई पटेल व महा विकास आघाडीतर्फे नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजित पाटील हे दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन माघारीनंतरचा कार्यक्रम निवडणूक आयोग राबवत असल्याने या दोन्ही उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.

मतदान 1 डिसेंबरला होणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक स्थगित होणार का निवडणूक होणार हे स्पष्ट नव्हते. त्यामुळे उमेदवारांनी माघारीनंतर प्रचारही थांबवला होता. आता आयोगाने निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर केल्याने उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. याच वेळेत सर्वांपर्यंत पोहोचावे लागणार आहे.

आघाडीतील नेत्यांचा लागणार कस ?

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे महाआघाडीचे सरकार आहे. सत्ता तिथे वलय या उक्तीप्रमाणे सध्या या पक्षांमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्या इनकमिंगचा फायदा विधान परिषदेच्या निवडणुकीत होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, एकनाथराव खडसे, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीष नाईक, आ.कुणाल पाटील, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, अनिल गोटे आदींसाठी तिन्ही पक्षातील आजी माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, पक्षांचे नेते, कार्यकर्ते आदींना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकत्रित मोट बांधावी लागणार आहे.

भाजपलाही लावावा लागणार कस

भाजपतर्फे माजी आमदार अमरिशभाई पटेल यांना विधान परिषदेत उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेचे तिकीट दिले. पक्षांतर्गत कलह असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या जुन्या व नव्या सर्वांनाच एकत्रित काम करावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या