जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते म्हणतात संचारबंदी योग्यच, भाजप प्रमुखांचा विरोध

जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते म्हणतात संचारबंदी योग्यच, भाजप प्रमुखांचा विरोध
Lockdown

सचिन दसपुते

करोनाची चेन तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून संचारबंदी लागू होत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता गर्दीच्या ठिकाणी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.

गोरगरीबांसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. करोना साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू केल्याचे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. मात्र, भाजप प्रमुखांनी याला विरोध केला आहे. याबाबत आम्ही जिल्हाप्रमुखांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

संचारबंदीच्या नावाखाली शासनाने सर्व व्यवसाय ठप्प केले आहेत. यामुळे सर्वसामान्याच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हातावर पोट भरणार्‍यांसाठी मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत, त्या केंद्र सरकारच्या आहेत. राज्य सरकार फक्त ‘आईच्या जीवावर बाईचा उद्धार’ करू पाहत आहे. शासनाने लॉकडाऊन न लावता करोना रोखण्यासाठी आरोग्याच्या सुविधा वाढीवर भर द्यावा, आदर्श निमावली तयार करून करोना आटोक्यात आणण्यासाठी नियोजन करावे

अरूण मुंडे (भाजपा जिल्हाध्यक्ष)

करोनाची चेन तोडण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महिन्यापासून सर्वांशी बोलून संचारबंदी करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. करोना वाढत आहे, नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे मुख्यमंत्री सांगत असताना लोक ऐकत नाही. यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी भारताच्या पंतप्रधानांनी कोणालाही विश्‍वासात न घेता लॉकडाऊन केले होते. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी बोलून निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष भाजप फक्त राजकारण करण्याचे काम करत आहे.

बाळासाहेब साळुंके (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

करोना वाढत असल्याने संचारबंदी करण्याबाबतचा निर्णय योग्य आहे. माणसे जगली पाहिजे, करोनाची चेन कमी झाली पाहिजे यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी, मोफत धान्य बरोबर आर्थिक सह्या केलेली मदत यातून लोकांना आधार मिळाला आहे. केंद्रसरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना जिल्हाप्रमुख)

अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. सर्वसामान्यांना सरकारने पॅकेज दिले आहेत. करोनाची चेन तोडण्यासाठी संचारबंदी करणे आवश्यक आहे. निर्बंध लागू करण्यासाठी सरकाने गरीबांचा विचार केला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत गर्दीचे ठिकाणे बंद केले आहेत. विरोधी पक्ष फक्त ओरडण्याचे काम करत आहे. माणसे मरत असताना ते पुढे येत नाही.

- कपिल पवार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com