
मुंबई | Mumbai
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज (३० ऑक्टोबर) रोजी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai) सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येतील असे सांगितले.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची राजभवनावर भेट घेत राज्यपालांनी मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू यांच्यासह तीनही पक्षांचे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे "मराठा समाजात असंतोषाची भावना असून त्याचा उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठा समाज आत्महत्या करत आहे. राज्यपाल आपण दुवा आहात, आपण राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी बोला. आपण जरांगे पाटलांशी बोला, त्यांना आश्वस्त करा. जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे. अघटीत घडू नये यासाठी मध्यस्थी करा, प्रश्न सोडवा. सरकार सकारात्मक तोडगा काढणार असेल तर आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन सहकार्य करू, हे सरकार एकमेकांवर ढकलत आहे, तिघांनी सामूहिक जबाबदारी घ्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
तसेच राज्यात दुष्काळ आणि शेतीचे प्रश्न गंभीर असून सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, या सरकारमधील लोक खोटे बोलण्यात पटाईत आहेत. त्यामुळे विशेष अधिवेशनापूर्वी आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा सार्वजनिक करा, अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळाकडून करण्यात आली.