विलासराव देशमुख
विलासराव देशमुख
राजकीय

विलासराव यांचा मोबाईल नंबर चाहत्यांसाठी आजही सुरु..!

फोन केल्यावर ऐकू येतात भाषण : दिवसभरात अनेकजण करतात फोन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । कुंदन राजपूत

महाराष्ट्राचे अनेक माजी मुख्यमंत्री फर्डे वक्ते म्हणुन सुपरिचित आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे स्व.विलासराव देशमुख. त्यांची सभा म्हणजे राजकीय मेजवानीच असायची. नुकतीच त्यांची सातवी पुण्यतिथी झाली. मात्र विलासराव यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर फोन केल्यावर आज देखील काॅल उचलला जातो.

समोरुन विलासरावांचे भाषण ऐकू येते. विश्वास नसेल तर ९८२११२५००० या नंबरवर फोन करुन बघा. फक्त त्यांचे कार्यकर्तेच नाही तर वडिलांची आठवण आल्यावर त्यांचे पुत्र अमित व धीरज देशमुख देखील या नंबरवर काॅल करतात.

विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील एक वेगळ रसायन. नेहमी हसमुख चेहरा. विरोधकांनी टाकलेला चेंडू हसत खेळत अगदी कोपरखळ्या मारत त्यांच्या खास शैलीत विरोधकांच्या कोर्टात टोलवायचे. फर्डे वक्ते ही त्यांची अोळख.

सामान्य माणसाशी व पक्षातील अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. राजकीय नेते, मंत्री हे फोनच उचलत नसल्याची अनेकांची ओरड असते. मात्र, विलासराव देशमुख हे अर्ध्या रात्रीही फोन उचलायचे हे सर्वांनाच माहिती होते. त्यांच्या ९८२११२५००० या पर्सनल मोबाईल नंबरवर कोणीही काॅल केला तरी ते फोन घ्यायचे. कोणी मॅसेज केला तर ते त्याला उत्तर देयचे. विलासराव यांनी रिप्लाय दिला नाही असे कधी झाले नाही असे काॅग्रेस पक्षातील लोक आजही सांगतात.

अगदी पोलिसांनी पकडले तरी काही जण विलासराव यांना फोन करायचे. या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी बाभळगावचा सरपंच ते दिल्लीत केंद्रिय मंत्री हा राजकिय प्रवास करत स्वता:चा खास ठसा उमटवला. त्यांची ही अोळख कायम ठेवण्याच्या उद्देशाने देशमुख कुटुंबीयांनी आजही त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवला आहे. अनेक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या फोनबुकमध्ये आजही विलासराव देशमुख यांचा नंबर सेव्ह आहे. त्यांना विलासरावांची आठवण आली की ते या नंबरवर फोन करतात.

एका दिवसाला साधारणत: ४ ते ५ तास हा फोन सुरु असतो. यामध्ये तंज्ञानाचा वापर करून व्हॉइस ऍक्टिव्हेशन म्हणून चालू ठेवण्यात आला आहे. त्यात केवळ गाजलेली काही मोजकी भाषणे ठेवण्यात आली आहेत. पुण्यतिथी किंवा निवडणुकांच्या काळात तर या फोन ओव्हरलोड होतो आणि सर्व्हर क्रॅशही होतो. असे असतानाही गेल्या ७ वर्षांपासून हा फोन चालूच आहे. त्यामुळे विलासराव आपल्यात असल्याची भावना निर्माण होते असे त्यांचे चाहते सांगतात.

विलासराव देशमुख यांनी जनसंपर्काच्या जोरावर गल्ली ते दिल्ली हा प्रवास केला. त्यांच्या पर्सनल मोबाईलवर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला तरी ते उचलायचे ही त्यांची खासियत. आज विलासराव आपल्यात नसले तरी त्यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर काॅल केल्यावर त्यांचा आवाज ऐकू येतो. जणू साहेब आपल्याशी बोलतात हे जाणवते.

- डाॅ.वसंत ठाकूर, शहराध्यक्ष काॅग्रेस सेवादल

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com