कोल्हे गटाच्या नगरसेवकांकडून पालिकेत खालच्या दर्जाचे राजकारण - नगराध्यक्ष वहाडणे

वहाडणे
वहाडणे

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

कोपरगाव नगरपालिकेतील कोल्हेना मानणारे उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती व नगरसेवक शहर विकासाच्या बाबतीतही अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.

कोपरगाव शहरात रस्ते व इतर विकास कामांचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वहाडणे यांनी वरील आरोप केले. ते पुढे म्हणाले, शहरवासियांची सोय व्हावी, शहराचा विकास व्हावा म्हणून काही प्रभागातील विकास कामांचे उदघाटन आ. काळे यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे निमंत्रण त्या त्या प्रभागातील नगरसेवक, बांधकाम सभापती तसेच उपनगराध्यक्ष यांना दिले होते. त्याचप्रमाणे त्यांची नावेही फलकावर टाकली होती. मात्र तरीही त्यांनी विरोधाला विरोध करायचा या हेतूने या विकास कामांच्या कार्यक्रमास येण्याचे जाणीवपूर्वक टाळले. अशा या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. त्याचप्रमाणे चालू असलेली सर्व विकास कामे ही दर्जेदार होणार अशी खात्री वहाडणे यांनी दिली.

नगराध्यक्षांनी आम्हांला राजकारण शिकवू नये - उपनगराध्यक्ष योगेश बागुल

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

पालिकेमध्ये राजकारण न करता शहर विकासासाठी कोणी निधी आणला हे जनतेला माहीत आहे. ज्यांनी निवडून आल्यापासून फक्त व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले, त्यांनी आम्हांला राजकारण शिकवू नये, अशी टीका उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर केली.

कोपरगाव शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी निरोप देऊनही उपनगराध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसून ते राजकारण करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला होता. या आरोपराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष बागुल म्हणाले, शहराच्या विकासासाठी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरातील अनेक प्रलंबित कामे केले. या कामांची भुमिपुजने, उदघाटने प्रसंगी वारंवार निमंत्रणे देऊनही थातुरमातुर कारणे सांगून त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे सातत्याने टाळले. मग त्यावेळी नगराध्यक्षांची राजकारणाची पातळी कोणती?

कोपरगाव नगरपालिकेमध्ये कोल्हे गटाचे बहुमत असतांना शहरातील जनहिताच्या प्रत्येक कामात आम्ही सर्वजण संमती देत असतो. नगराध्यक्षांनी निवडणुकीच्या काळात कोपरगावकरांना अनेक विकासाची स्वप्ने दाखविली. परंतु प्रत्यक्षात किती निधी आणून आपण शहरावासियांना दिलेल्या प्रश्नाला जागलात.

हे जनतेला सांगून ज्यांनी कोट्यवधी रूपयाचा निधी आणून शहरविकास साधण्याचे काम केले. त्यांना तिरस्कार आणि ज्यांनी दमडीही दिली नाही त्यांचा उदोउदो केला जातो. आम्ही जनतेच्या प्रती प्रामाणिक आहोत, त्यांचेवर आलेल्या संकटाच्या वेळी आम्ही पुढे असणारी माणसे आहोत. आपण मात्र केवळ पोकळ आरोळ्या आणि चारोळ्या यातच दंग असतात. प्रत्येकवेळी केवळ कोल्हेंच्या नावाने ओरडून आपली पोळी भाजण्याचे काम करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com