गटारीही न करणार्‍यांनी लायकीत बोलावे – बोरावके

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणवून मिरवून घेताना ज्यांना प्रभागातील गटारी करता आल्या नाहीत त्यांनी आपली लायकी पाहून बोलावे, असे खडे बोल राष्ट्रवादीचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके व नगरसेविका सौ. माधवीताई वाकचौरे यांनी विरोधी भाजपाच्या नगरसेवकांना सुनावले आहे.

कोपरगाव नगरपरिषद

हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाच्या संचालकाची भेट घेऊन अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही याची माजी आमदारांनी आपल्या चेल्यांना पुढे करून टीका केली होती. त्या टीकेला उतर देताना गटनेते विरेन बोरावके व नगरसेविका सौ. माधवीताई वाकचौरे यांनी उत्तर देत खरपूस समाचार घेतला आहे.

बोरावके व वाकचौरे म्हणाले, लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची पूर्वीपासूनची नागरिकांची मागणी आहे. माजी आमदारांच्या पक्षाचे गल्लीपासून दिल्ली पर्यंत सरकार असताना त्यांना हा प्रश्न मार्गी का लावता आला नाही. याचे उत्तर चेल्यांनी आपल्या नेत्यांना विचारले पाहिजे.

आमदार आशुतोष काळे

यांनी याबाबत नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाच्या संचालकाची भेट घेतली त्यावेळीच माजी आमदारांना या नागरिकांची आठवण झाली का? मग पाच वर्षे काय केलं? असा सवाल उपस्थित करून लोकांना वेड्यात काढायचे बंद करा, असा सल्ला विरेन बोरावके व सौ.माधवीताई वाकचौरे यांनी माजी आमदार व त्यांच्या चेल्यांना दिला आहे.

विकास कामांच्या बाबतीत आ. काळे काय चीज आहे हे पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पूर्ण करून त्यांनी निवडणुकीनंतर तीनच महिन्यांत दाखवून दिले आहे. विरोधकांच्या नेतृत्वाला स्वत:च्या पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात असताना काम करता आले नाही. करोनाच्या संकटात देखील मतदारसंघात विकास कामे सुरू आहेत. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये.

– विरेन बोरावके

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *