
मुंबई | Mumbai
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने (ED)आणि आयकर विभागाने (Income Tax department)एकत्रितरित्या पहिली कारवाई केली आहे. या दोन्ही विभागाकडून राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ ((Hasan Mushrif ) यांच्या घरावर छापे मारले आहेत. कागलचे माजी नगराध्यक्ष (Former mayor) प्रकाश गाडेकर (Prakash Gadekar) यांच्या निवासस्थानी ईडीने सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
या छापेमारीनंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरु झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले,'हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटी रुपये स्वत:, मुलगा आणि जावायच्या नावाने कोलकात्यामधील अनेक बोगस आणि शेल कंपनीत गुंतवले. त्यानंतर हे पैसे परिवाराच्या कंपनीत घेत, सरसेनापती कारखान्याच्या खात्यात वळवले. २८ सप्टेंबर २०२१ ला कोल्हापूर महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी निघालो होतो. पण, तेव्हा हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला जाऊ दिलं नाही. मात्र, आता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हसन मियांचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे.'
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी एका विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्यांनी म्हणाले, 'हसन मियांना आता धर्म आठवतो का? मी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात असताना मला अडवलं. तेव्हा मुस्लीम धर्म नाही आठवला. पैसे खाताना आणि गरीब शेतकऱ्यांना लुटताना धर्म नाही आठवला.' तसेच, 'बोगस बंद कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या परिवाराच्या अकाऊंटमध्ये भ्रष्टाचाराचे ५० कोटी रुपये आले. मात्र, हसन मुश्रीफांनी थोडा धीर धरावा. कारण, पहिल्यांदा अनिल परब, हसन मुश्रीफ आणि मग अस्लम शेख यांचा नंबर आहे,' असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी १ जानेवारी रोजी ट्विट करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सूचक इशारा दिला होता. या ट्विटनंतर पहिल्यांदा अनिल परब (Anil Parab) आणि आता हसन मुश्रीफ यांना ईडीकडून झटका बसला आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केले होते. हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला १५०० कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट नातेवाईकांना दिले गेले अशी तक्रारही किरीट सोमय्यांनी केली होती.