Kasba Bypoll Election : महाविकास आघाडीच ठरलं! कसब्यातून काँग्रेसची ‘या’ नेत्याला उमेदवारी, आजच अर्ज भरणार

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

पुणे | प्रतिनिधी

कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राजकीय धुरळा उडणार आहे आणि राजकारण रंगणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनेही मोठा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीने रासने यांच्याविरोधात काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना मैदानात उतरवले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्वीट करत ही उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी घोषित केल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे यावरुन स्पष्ट झालं आहे.

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं धंगेकर यांनी सांगितलं.

तसेच धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. यावेळी रोहित टिळकही उपस्थित होते. यावेळी धंगेकर यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घातला. मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. यावेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर होत्या. मी नगरसेवक असताना त्यांच्यासोबत काम केलं आहे. प्रत्येक निवडणुकीत केसरीवाड्यात येऊन मी टिळकांचं दर्शन घेत असतो. त्याप्रमाणे आजही आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.

…तर काँग्रेसने कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, हे घोषित करावं”; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान

कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. दरम्यान, पटोलेंच्या या विधानाचा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही जगताप यांच्या घरातही उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का? मुळात काँग्रेसला पुण्यातील दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिकळांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावं”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच “नाना पटोले जे म्हणत आहे, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com