
पुणे | Pune
भाजपच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगाने निधन झाल्यामुळे दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. आता कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे. ही पोट निवडणूक रद्द होऊ शकते, असे मोठे विधान ॲड. असीम सरोदे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे...
ॲड. असीम सरोदे म्हणाले की, २६ फेब्रुवारीला कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागेसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारीपासून शिवसेनेत बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भारतीय संविधानातील कलम १७२ नुसार विधानसभेचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. राज्यात २०१९ साली १४ वी विधानसभा अस्तित्वात आली. पण, शिवसेनेत फूट होऊन नवीन सरकार स्थापन झाले. त्याप्रकरणाचे कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंग आहेत, ते सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आले. यावर १४, १५ आणि १६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत निकाल येऊ शकतो.
सर्वोच्च न्यायालयाने १४ किंवा १५ तारखेला निकाल देत महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त केली, अथवा हे सरकार चुकीचे आहे, असा निर्णय दिला. तर, राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशावेळी कलम १७२ नुसार विधानसभा टिकत नाही. त्यामुळे विधानसभा विसर्जित झाल्याने निवडणुकांचे आयोजन होऊ शकत नाही. त्यासाठी मतदानही केले जाऊ शकत नाही.
१४ तारखेला विधानसभा बरखास्त झाली, तर कोणत्याही प्रकारे निवडणुकांचे आयोजन होणे शक्य नाही. त्यामुळे कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण ७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
दोन्ही पोटनिवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. आज सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे देखील आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत.