मोर्चात सहभागी व्हा - मविआ नेत्यांचे आवाहन

मोर्चात सहभागी व्हा - मविआ नेत्यांचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महापुरुषांबद्दल सतत बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय नसल्याने १७ डिसेंबर रोजीच्या महामोर्चात राज्यातील सर्व जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी केले. मोर्चाला अजून परवानगी मिळालेली नाही. मात्र ती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. सध्या मागील दाराने नव्हे तर पुढील दारानेच आणीबाणी आणली जात आहे. आता सगळयांनीच जागे झाले पाहिजे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्याप्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे असेही लोकं सहभागी होतील, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या - ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या - त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्यामार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकची बाजू सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी मांडणार आहेत हे समजल्यावर आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिले. तसेच मुख्यमंत्री यांनाही पत्र दिले आहे. सीमाभागातील लोकांची आग्रही मागणी लक्षात घेता आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात चांगल्या पद्धतीने मांडणे आवश्यक आहे, असे आम्ही फडणवीस यांना सूचवले आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com