राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आता कवाडे यांची 'पीआरपी'ही

राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आता कवाडे यांची 'पीआरपी'ही

मुंबई | Mumbai

राज्यात भीमशक्ती-शिवशक्तीचा नवीन प्रयोग पुन्हा अस्तित्वात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत पार पडली. बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आघाडीची घोषणा आज जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाला आहे.

यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून या युतीची बोलणी सुरु होती. महाराष्ट्राला आज एक धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. हे सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती सर्वसामान्य जनतेने दिली आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही या युतीचा निर्णय घेतला आहे. शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची ही युती आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल. ही युती महाराष्ट्रात पाच जाहीर सभा घेणार आहेत. तिथे हजारोंच्या संख्येत लोक येतील.

या पत्रकार परिषदेत जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. नागपूर मधील अंबाझरी उद्यानाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर चार कोटी रुपये खर्च करुन डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक भवन उभारले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही वीस एकरची जागा पर्यटन विभागाला देण्यात आली. तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या जागेवर बुलडोजर फिरवला. हे होत असताना आम्ही सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना भेटलो, आमचे म्हणणे मांडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चार वेळा निवेदन दिले. आदित्य ठाकरेंचीही भेट घेऊन निवेदन दिले. पण आमच्या निवेदनाची साधी दखलही त्यांनी घेतली नाही. असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलतांना म्हणाले की, सर्वांना मुख्यमंत्री आपला माणूस आहे असे वाटतंय म्हणून एकत्र येत काम करताय. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती झाल्याचा मला आनंद आहे. त्यांचा आणि आमचा दोन्ही पक्ष हे संघर्षातून पूढे आले आहेत, हा साधासोपा संघर्ष नव्हता. दोन्ही पक्ष लोकांना न्याय देण्यासाठी एकत्र आले आहेत, मात्र या आधीपासून माझे आणि कवाडे यांचे संबंध चांगले होते असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे, आता एक चांगली सुरूवात झाली असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे. कवाडे यांनी केलेले ओबीसी आंदोलन हे देशव्यापी होते. त्यांनी लॉग मार्च काढले संघर्ष केला आणि ते आज इथेपर्यंत आले आहेत. यापुढे महाराष्ट्रसाठी आम्ही सोबत येऊन चांगले काम करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com