जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; गोपीचंद पडळकरांचे मोठे विधान

जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; गोपीचंद पडळकरांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यातलं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आणि दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

भाजपानं शिवसेना फोडली, असा आरोप आजपर्यंत अनेकदा ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही केला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याच दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागतो. मी विश्वासाने सांगतो हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. राष्ट्रवादीचे ९० टक्के कार्यकर्ते म्हणतील आता आपल्याला भाजपात जावं लागेल. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे. तिथे नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोकं म्हणतील आता भाजपमध्येच जाऊया. आता काही पुढं राहिलं नाही, असा दावाही त्यांनी केला. पडळकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात. काही दिवसांपुर्वीच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होते. या अधिवेशनात जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना अजित पवार दोनदा उठून सभागृहाबाहेर गेले. यामुळे नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. यावरुन सत्ताधाऱ्यांकडूनही जयंत पाटलांना विरोधी पक्षनेते पदावरुन चिमटे काढले होते. तर, विरोधी पक्षनेते पदावरुनही एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना अधिवेशनात डिवचले होते. यामुळे कुछ तो गडबड है, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com