जामखेड पंचायत समिती सभापतिपदाची निवड 3 जुलैला
राजकीय

जामखेड पंचायत समिती सभापतिपदाची निवड 3 जुलैला

महिलेसाठी पद आरक्षित : पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर निवड प्रक्रियेला मुहूर्त

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी) - गेले पाच महिने रखडलेल्या जामखेड पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीचा मार्गअखेर मोकळा झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात आदेश काढत निवडीचा कार्यक्रम घोषित केला. 3 जुलैला पार पडणार्‍या निवडीत महिलेसाठी सभापतिपद आरक्षणाची घोषणा आदेशात असल्याने तालुक्याचे लक्ष निवड प्रक्रियेकडे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जत प्रातांधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापतिपदांच्या आगामी काळातील आरक्षणाची सोडत 12 डिसेंबर 2019 ला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. सोडतीत जामखेड पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्चित झाले. मात्र, या पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरले. त्यानुसार जामखेड पंचायत समितीतील गणाची नावे व प्रवर्गासह प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे रवाना करण्यात आला.

15 दिवसांच्या कालावधीनंतर जामखेड पंचायत समिती सभापती निवडीसंदर्भात कोणतेही मार्गदर्शन प्राप्त झाले नव्हते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जामखेड सभापती आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शक निर्देश दिले. ग्रामविकास खात्याचे पत्र जिल्हा प्रशासनात 27 डिसेंबर 2019 रोजी प्राप्त झाले. त्यावर अनुसूचित जमाती वगळून अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.

सोडतीत जामखेड सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले. सभापती पदासाठी निर्धारित मुदतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर निवडप्रक्रिया घेण्यात आली. त्यावेळी सभापती पदासाठी राजश्री मोरे यांचा एकमेव अर्ज आला. मात्र, अर्ज माघारीच्या मुदतीत मोरे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सभापतिपद रिक्त राहिले. उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल करणार्‍या मनीषा सुरवसेंची निवड झाली. तेव्हापासून तब्बल पाच महिने जामखेड पंचायत समितीचे सभापतिपद रिक्त आहे. प्रभारी सूत्रे उपसभापती सुरवसे यांच्याकडे आहेत.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानुसार 3 जुलै रोजी जामखेड पंचायत समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया होत आहे. महिलेसाठी सभापतिपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com