Thursday, April 25, 2024
Homeराजकीयजामखेड : भाजप राष्ट्रवादीकडे समसमान बल ; १५ ऑक्टोबरला मतमोजणी

जामखेड : भाजप राष्ट्रवादीकडे समसमान बल ; १५ ऑक्टोबरला मतमोजणी

जामखेड |तालुका प्रतिनिधी|Jamkhed

जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. पण निकाल घोषित करण्यास मनाई करण्यात आली होती.

- Advertisement -

आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १५ ऑक्टोबर रोजी सभापती पदाचा निकाल घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप व राष्ट्रवादीकडे समसमान बल असल्यामुळे सभापती पदी राजश्री मोरे की मनिषा सुरवसे याकडे तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे.

जामखेड पंचायत समितीचे एकूण चार सदस्य आहेत ते सर्व भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दोन सदस्य राजश्री मोरे व सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला होता. काही दिवसांनी आव्हाड पुन्हा भाजपमध्ये परतले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वसाधारण महिलासाठी सभापती पदाचे आरक्षण जाहीर केले होते. या आरक्षणाला पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. सभापती निवड प्रक्रियेपूर्वी दोन दिवस अगोदर पं. स. सदस्य सुभाष आव्हाड हे पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले. यामुळे भाजप व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन सदस्य झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

उच्च न्यायालयाने सर्वसाधारण महिला सभापती पदासाठी तीन जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यास सांगितले पण निकाल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या निगराणीत निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपकडून मनिषा सुरवसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर भगवान मुरूमकर सुचक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजश्री मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर सुभाष आव्हाड यांनी स्वाक्षरी केली त्यामुळे निवडणूकीत समसमान बल दोन्ही उमेदवारांच्या बाजुने झाले पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी घेण्यात आली नाही.

येथ पर्यंत प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी करून उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार कार्यवाही करण्याचे उपस्थित सदस्यांना सांगून बैठक तहकूब केली.

५ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांची याचिका निकाली काढली व सभापती पद निवडीचा निकाल घोषित करण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृहात सदस्यांची बैठक बोलावून निकाल घोषित करण्यात यावी.

असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले आहेत त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सदस्यांना उपस्थित राहण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

१५ ऑक्टोबर रोजी सभापती पदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी केली जाईल जर समसमान मते दोन्ही उमेदवाराला मिळाले तर चिठ्ठी काढण्यात येईल व त्यानुसार निकाल घोषित केला जाईल.

प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही उमेदवाराला समान मते मिळणार असल्याने चिठ्ठीवर राजश्री मोरे की मनिषा सुरवसे याबाबत निर्णय होईल. त्यामुळे तूर्त तरी मोरे की सुरवसे हा विषय १५ ऑक्टोबर पर्यंत चर्चीला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या