Thursday, April 25, 2024
Homeराजकीयजि.प.च्या करेक्ट कार्यक्रमासाठी सज्ज

जि.प.च्या करेक्ट कार्यक्रमासाठी सज्ज

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आता जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतरणाच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे.

जळगाव महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेत सत्तांतर करणार काय? या प्रश्नावर पालकमंत्री ना.पाटील म्हणाले की, सत्तांतर आम्ही करत नाही तर भाजपचे लोक सत्तांतर करतात. कारण तेच कंटाळलेले असतात.आमच्याकडे आल्यानंतर आपोआप तेच सत्तांतर करणार आहेत.

- Advertisement -

ना.गुलाबराव पाटील,पालकमंत्री

एकनाथराव खडसे यांच्या भेटीनंतर जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी सोमवारी रात्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.

अजिंठा रेस्ट हाऊसवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत ना.पाटील यांनी सर्व गटनेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेत करेक्ट कार्यक्रम लावण्यासाठी महाविकास आघाडीचे गटनेते सज्ज झाले असून यामुळे आता जिल्हा परिषदेत केव्हाही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेतील भाजपचे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीला येऊन मिळाल्यानंतर याठिकाणी सत्तांतर होऊन अनेक वर्षांनंतर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता.

आता महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषदेचा गडही काबीज करण्यासाठी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

आठवडाभरापूर्वी जिल्हा परिषदेतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतली होती.

खडसेंनीही राजकीय समीकरणांच्या आधारावर सत्तांतरणाचा निर्णय घेतला होता आणि गटनेत्यांना काही दिवस थांबा, अशा सूचनाही केल्या होत्या. खडसेंनंतर आता सोमवारी रात्री जिल्हा परिषदेतील सर्व पक्षीय गटनेत्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतली.

अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री व गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे उपगटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत आदींंची उपस्थिती होती.

या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गटनेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे सोमवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेवर जिल्हा परिषदेत विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता.

त्यानंतर सर्व पक्षीय गटनेते आणि पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लवकरच सत्तांतरण होणार असल्याचे सांगितले होते.

आता काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महाविकास आघाडीच्या सर्व गटनेत्यांनी भेट घेतल्याने जिल्हा परिषदेत सत्तांतरणाच्या हालचालीला जोरदार वेग येणार असून जिल्हा परिषदेत कुठल्याही क्षणी राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून सर्व पक्षीय गटनेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या