जळगाव तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात 783 ग्रामपंचायतींपैकी 93 ग्रा.प.बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 687 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतमोजणीची प्रक्रिया जिल्ह्यातील पंधरा तालुकास्तरावर तहसिल प्रशासनामाकडून घेण्यात आली.

जळगाव तालुक्याची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात पार पडली. तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना 27, राष्ट्रवादी 9, भाजप 5 आणि 2 ग्रा.पं. बिनविरोध झाल्या आहेत. ग्रा.पं.च्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देवून शिवसेनेने वर्चस्व राखत गड कायम ठेवला आहे. दरम्यान, विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी पुष्पवर्षाव आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

जळगाव तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायतीचे सदस्य बिनविरोध निवडण्यात आले आहेत. यात नशिराबाद ग्रा.पं.च्या सर्वच उमेदवारांनी एकजूट दाखवत नगरपंचायत निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी माघार घेत पहिला धक्का दिला होता. उर्वरित 40 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तालुक्यात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली या निवडणूकीत 1038 उमेदवारांनी आपले नशिब अजमावले.

जिल्ह्यात अशा आहेत मोठ्या 17 सदस्यीय ग्रा.पं. शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र.न. म्हसावद, आसोदा, ममुराबाद, कानळदा,कुसुंबे खु, 15 सदस्य – भादली बु., 13 धानवड, भोकर, 11 सदस्यीय बोरनार, नांद्रा बु, सावखेडा बु, मोहाडी, देव्हारी,जळगाव खु, तर 9 सदस्यीय गाढोदा, फुफणी, लमांजन वाकडी रामदेववाडी, शेळगांव कानसवाडे, कडगांव, पिलखेडा,दापोरा, मन्यारखेडा, फुफ नगरीं,तरसोद यासह सात सदस्यीय रिधुर,डिकसाई, कठोरा,आवार, धानोरा नागझिरी, ग्रा.पं.आहेत.

जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी आज नूतन मराठा महाविद्यालय आवारातील हॉलमधे करण्यात आली. या मतमोजणीदरम्यान सकाळी आठ वाजेपासूनच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठया प्रमाणावर कोर्ट चौक परीसरात गर्दी केली होती. तहसिल निवडणूक प्रशासनाकडून ज्या गावाची मतमोजणी होणार त्या उमेदवार प्रतिनिधींना आत सोडण्यात येत होते. यावेळी या ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात येवून कोर्ट चौक ते तेली समाज मंगल कार्यालय पर्यतची वाहतुक बंद करण्यात आली होती.

जसजसे निकाल जाहिर होत होते तसे समर्थकांची उत्सुकता वाढीस लागली होती. विजयी उमेदवारांचे प्रतिनिधी समर्थक बाहेर येताच एकच गल्ला करण्यात येत होता.

सर्वप्रथम शिरसोली प्र.बो. तर रिधूरचा निकाल शेवटी

सर्वप्रथम शिरसोली प्र.बो ग्रामपंचायतीचा निकाल पहिल्या अर्धा पाउण तासातच जाहिर करण्यात आला, यानंतर टप्प्याटप्प्याने बारा वाजे दरम्यान मोठया ग्रा.पं.चे निकाल हाती येवू लागले होते.

सुमारे बारा ते एक वाजेदरम्यान भादली बु. ग्रा.पं.चा निकालादरम्यान अंजली पाटील या तृतीय पंथी उमेदवाराचा निकाल जाहिर करण्यात आला होता. तर सर्वात शेवटी रिधूर ग्रा.पं.चा निकाल सुमारे साडेचार वाजेदरम्यान जाहिर झाला होता.

कानळद्यात शिवसेना, भाजप तालुकाध्यक्ष पराभुत

तालुक्यातील ग्रा.पं.निवडणुकीत शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण त्यांच्या पत्नी निता चव्हाण, मुलगा तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *