जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतांनाच रविवारी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उभारुन एक गट फुटला असून, तो सुरक्षित स्थळी रवाना झाल्याची चर्चा आहे.

तसेच शिवसेनेचे १५ नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना झाले आहे. दरम्यान, १८ मार्च रोजी महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी होणार्या निवडीसाठी ऑनलाईन सभेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खान्देश विकास आघाडीची ३५ वर्षांची सत्ता मोडीत काढीत भाजपने ५७ नगरसेवक निवडून आणून महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवला.

सुरवातीला महापौर पद सीमा भोळे तर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांना दिले होते. त्यांचा दीड वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौर भारती सोनवणे आणि उपमहापौर सुनील खडके यांना संधी दिली.

महापौर,उपमहापौर यांचा दीड वर्षांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपुष्टात येत असून भाजपमधूनच महापौर,उपमहापौर पदासाठी मातब्बर नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.