जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव महानगर पालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे मनपात सत्तांतरासाठी गेल्या तिन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरु आहे.

जळगाव मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर विकासाच्या दृष्टीने फार मोठी अपेक्षा होती. मात्र विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे जनता नाखुश आहे आणि नगरसेवकही नाखुश आहेत. नेेते त्यांना विश्वासात घेत नव्हते. त्यामुळे नगरसेवक नाराज होते. त्याचाच परिपाक म्हणून, असंतोष नगरसेवकांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून, जळगाव मनपात सत्तांतर होणार आहे.
एकनाथराव खडसे,माजी मंत्री रा.कॉ.

भाजपचे नाराज नगरसेवक हे केवळ संपर्कातच नाहीत तर, ते आमच्या सोबत आहेत. जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर होईलच. याबाबत दि. 18 मार्च रोजी होणार्या महापौर, उपमहापौर निवडीला चित्र स्पष्ट दिसेल.
गुलाबराव पाटील, पालकमंत्री

भाजपचे काही बंडखोर नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून, काही नगरसेवक शिवबंधनात अडकल्याची चर्चा आहे. दरम्यान, मनपाच्या सत्तासंघर्षात आता नेत्यांची कसोटी पणाला लागली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे 57 नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे.

महापौर, उपमहापौर पदाची दि. 18 मार्च रोजी निवड होणार आहे. महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून अनेक इच्छूकांनी मोर्चेबांधणी केली आहे.

अशातच नेत्यांवर नाराज असलेले भाजपचे 28 ते 30 नगरसेवक दोन दिवसांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर उर्वरीत भाजपचे नगरसेवक हे नाशिक येथे सुरक्षित स्थळी आहेत. दरम्यान, राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता कायम असणार आहे. राज्यातील ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. सत्तेचा धाक आणि पैशाचे आमिष दाखवून नगरसेवक फोडण्याचे काम केले जात आहे. यात भाजपचे काही नगरसेवक त्यांच्या मोहाला बळी पडले आहेत. बंडखोरी केल्यास संबंधीत नगरसेवकांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
गिरीष महाजन, माजी मंत्री भाजप

लढ्ढा फार्म हाऊसवर रणनिती

भाजपचे नाराज असलेले नगरसेवक हे शिवसेनेकडे आल्यामुळे सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

शिवसेनेने महापौर पदाचे उमेदवार म्हणून जयश्री महाजन तर उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून भाजपचे फुटीर नगरसेवक कुलभूषण पाटील यांचे नाव जाहीर केले आहे.

भाजपचे नगरसेवक शिवसेनेकडे येत असल्यामुळे मनपातील सत्तांतर जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे, दोन दिवसांपासून लढ्ढा फार्म हाऊसवर रणनिती आखली जात आहे.

महापौर, उपमहापौर पदासाठी शिवसेना आज अर्ज दाखल करणार

भाजपतील नाराज नगरसेवकांचा एक गट गळाला लागल्यामुळे शिवसेनेची सत्तांतराची आशा पल्लवीत झाली आहे. सत्तेसाठी संख्याबळ असल्याचा दावा करत शिवसेनेने महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज घेतले आहे. प्रशांत नाईक, अमर जैन, ईबा पटेल, नितीन बरडे यांनी सोमवारी महानगरपालिकेतून अर्ज नेले असून, उद्या दि. 16 रोजी दाखल करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे नगरसेवकही जाणार मुंबईला

जळगाव महानगर पालिकेतून भाजपची सत्ता खेचून आणण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपुर्वीच भाजपचे काही नगरसेवक मुंबईला गेले असून, काही नगरसेवकांनी मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेचेही नगरसेवक नेत्यांच्या भेटीसाठी उद्या दि. 16 रोजी जाणार असल्याचे वृत्त आहे.

... तर बंडखोर नगरसेवकांवर कारवाई

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेसाठी गेल्या दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरु आहे. पक्षावर नाराज असलेले भाजपच्या नगरसेवकांनी बंड पुकारल्यामुळे गटनेता भगत बालाणी यांच्या स्वाक्षरीने नगरसेवकांना व्हीप बजावला आहे.

नगरसेवकांना व्हॉटस्अॅपवर, स्पीड पोस्टव्दारे आणि काही नगरसेवकांना प्रत्यक्ष व्हीप बजावण्यात आले आहे.

महापौर निवडीच्या दिवशी वेळेवर हजर राहून पक्षाच्या उमेदवाराला मतदान न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.