Saturday, April 27, 2024
Homeजळगावमहापालिकेत भाजप सत्तेवरुन पायउतार

महापालिकेत भाजप सत्तेवरुन पायउतार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मनपात शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला असून भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या जोरावर शिवसेनेने मनपाच्या महापौरपद, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली.

- Advertisement -

सांगली पर्टननंतर जळगाव मनपात पुरेसे संख्याबळ नसताना शिवसेनेने सत्ताधारी पक्षातील 27 फुटलेल्या नगरसेवकांसह सत्ता स्थापन केली.

गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला अखेर पायउतार होण्याची वेळ आली. महानगरपालिकेत शिवसेनेने पुन्हा आपले वर्चस्व सिध्द करत, सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, शिवसेनेने फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष केला.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी गुरुवारी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थित ऑनलाईन विशेष सभा घेण्यात आली.

दुसर्या मजल्यावर झालेल्या या सभेत जिल्हाधिकार्यांसह आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे मंचावर होते.

तसेच सभागृहात उमेदवारांव्यतिरिक्त कोणलाही प्रवेश जिल्हाधिकार्यांना नाकारला होता. सकाळी 11 वाजेपासून सुरु असलेली निवड प्रक्रिया दुपारी 2.30 वाजेपर्यंत सुरु होती.

भाजपच्या या फुटीर नगरसेवकांनी केले शिवसेनेला मतदान

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीत भाजपतील 27 फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले आहे. यात प्रिया जोहरे, सरीता नेरकर, अ‍ॅड. दिलीप पोकळे, रुक्साना बी. खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिभा देशमुख, कुलभूषण पाटील, ललित कोल्हे, पार्वताबाई भिल, सिंधूताई कोल्हे, ज्योती चव्हाण, रेखाताई पाटील, सुरेखा सोनवणे, रेशमा काळे, मनोज आहुजा, मिनाक्षी पाटील, सुनिल खडके या भाजपच्या फुटीर नगरसेवकांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या जयश्री महाजन, कुलभूषण पाटील यांचा विजय

महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांचा तब्बल 15 मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना 45 मतं मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना 35 मते मिळाली. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीदेखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा विजय सुकर झाला. महापौरपदाची निवड झाल्यानंतर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया सुरु झाली. महापौरपदासाठी झालेल्या मतदानाचा कित्ता उपमहापौरपदासाठीसुद्धा गिरविण्यात आला. शिवसेनेचे उमेदवार तथा भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश सोनवणे यांचा तब्बल 15 मतांनी पराभव केला. कुलभूषण पाटील यांना 45 मते तर सुरेश सोनवणे यांना 35 मते मिळाली.

असे आहे संख्याबळ

मनपात भाजपचे 57, शिवसेनेचे 15, एमआयएमचे तीन असे एकूण 75 नगरसेवक आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या आधी अंतर्गत राजकारणातून भाजपमध्ये फूट पडली. भाजपचे 27 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यांना पक्षाविरोधी मतदान करण्यासाठी भाजपाकडून शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी भाजपाला यश आले नाही.

व्यत्यय आणणार्‍या नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी दिली तंबी

महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया ऑनलाईन झाली. निवड प्रक्रियेदरम्यान, भाजपच्या काही नगरसेवकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. व्यत्यय आणल्यास संबंधीत नगरसेवकांवर कारवाई केली जाईल. अशा शब्दात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तंबी दिली.

विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन आणि उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांनी नावे जाहीर केले. त्यानंतर दोन्ही उमेदवारांचे जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे सत्कार करण्यात आला. तसेच मनपासमोर शिवसेनेतर्फे फडाके फोडून दोन्ही उमेदवरांचे जल्लोषात स्वागत केले.

महापौरांच्या अर्जावरील सूचक, अनुमोदकांच्या नावाला भाजपची हरकत

निवड प्रक्रिया सुरु होताच महापौर आणि उपमहापौरपदासाठी शिवसेकडून उमेदवारांच्यांच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेत पीठासीठ अधिकार्यांनी ते अर्ज रद्द करण्याची मागणी केली. यावेळी अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र जिल्हाधिकार्यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. तसेच निवड प्रक्रिया बेकायदेशीर सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केला. भाजपचे सदस्य आक्रमक झाल्यानं सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू होता. तसेच भाजपाच्या सदस्यांना निवड प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड.शुचिता हाडा, जितू मराठे, कैलास सोनवणे, भगत बालाणी यांनी केला. त्यानंतर कुलभूषण पाटील, नितीन लढ्ढा, प्रशांत नाईक यांच्यात काही काळ खंडाजंगी सुरु होती.

महापौरांनी स्वीकारला पदभार

शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन या विजयी झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात महापौरपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर शिवसेना कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनकडून औक्षण करण्यात आले. तसेच शिवतिर्थ मैदानावर जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन नूतन महापौर जयश्री महाजन यांनी अभिवादन केले.

मनपा परिसरात प्रचंड पोलीस बंदाबस्त

महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप-शिवसेनेकडून काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु होता. तसेच दोन्ही पक्षांकडून आपला उमेदवार बहुमताने निवडूण येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे निवड प्रक्रियेत काही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून गुरुवारी सकाळपासूनच मनपा परिसरात दांडगा पोलीस बंदाबस्त होता. तसेच प्रवेशद्वारावरसुद्धा मोजक्याच जणांना येऊ देत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या