खडसेंच्या स्वागतप्रसंगी राष्ट्रवादीतील गटबाजी उघड

महानगराध्यक्षांसह केवळ महिला पदाधिकार्‍यांची झाली गर्दी
खडसेंच्या स्वागतप्रसंगी राष्ट्रवादीतील गटबाजी उघड
Kaushik K Shil

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.23 ऑक्टोबर रोजी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचा प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला.

त्यानंतर जळगावकडे स्वजिल्हयात परतत असतांना वाटेवर ठिकठिकाणी खडसेंचे मोठया उत्साहाने स्वागत करण्यात आले.

शनिवार दि.24 रोजीच्या कार्यक्रमात मात्र या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी केवळ जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आणि मोजक्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह केवळ महिला पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यासंदर्भात राष्ट्रवादी महानगरकडून कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याने वा विचारणाच केली नसल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सांगीतले.

त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गट-तट या निमित्ताने उघड झाले असल्याचे दिसून आल्याचे बोलले जात आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर शुक्रवारी रात्री उशीराने जळगाव शहरात पूर्वाश्रमीचे भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसेंसोबत जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचे आगमन झाल्याने त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम शनिवार दि.24 रोजी सकाळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

खडसेंच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतांना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांचेसह पक्षातील माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ.सतीष पाटील, दिलीप वाघ यांचेसह एकमेव विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्यासह कोणत्याही नेत्यांना विश्वासात घेतले नसून कार्यक्रमाची प्राथमिक माहिती दिली गेली नसल्याचे अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी सांगीतले.

एरवी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सर्व कार्यक्रमांना जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षांसह बहुतांश सर्वच जुन्या ज्येेष्ठ नेत्यांची उपस्थिती मोठया प्रमाणावर असते. परंतु खडसेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर पहिल्याच स्वागत कार्यक्रमप्रसंगी या नेत्यांची अनुपस्थितीमुळे एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गट-तटाचे राजकारण पुन्हा या निमित्ताने पहावयास मिळाल्याची चर्चा ठिकठिकाणी केली जात होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com