भाऊंच्या स्वागताची जय्यत तयारी

आनंदोत्सव । खडसेंच्या सत्काराची तयारी पूर्ण; राष्ट्रवादी कार्यालयात आज सीमोल्लंघन
भाऊंच्या स्वागताची जय्यत तयारी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबतच जळगाव, धुळे, नंदूरबार आदी जिल्ह्यातील भाजपाचे विविध आजी माजी जिल्हाध्यक्ष, दूध संघ, जिल्हा बँक आदीं संस्थांमधील सुमारे 72 पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश केला.

गत 40 वर्षात पक्ष संघटन वाढविण्यासाठी हयात खर्ची घातलेले संघर्षयात्री माजी मंत्री नाथाभाऊ यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने आनंददायी उत्साहवर्धक वातावरण असून विजयादशमीच्या सिमोल्लंघनानिमित्त आजच सिमोल्लंघन होणार आहे.
कल्पना पाटील, जिल्हाध्यक्षा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई येथील पक्षप्रवेशानंतर एकनाथराव खडसे जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, अशोक लाडवंजारी आदी समर्थकांसह सुमारे 35 ते 40 वाहनांचा ताफा जळगावकडे येण्यास निघाला असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेशामुळे जिल्हयातच नव्हेतर अन्य परिसरात देखील उत्साहाचे वातावरण तयार झाले असून जळगावकडे येतांना नाशिक, ओझर, पिंपळगांव बसवंत, चांदवड, मालेगाव, धुळे, फागणे, पारोळा, एरंडोल यासह अन्य ठिकाणी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येत आहे.

एकनाथराव खडसे आणि त्यांच्या सोबत असलेल्या जिल्हयातील विविध पदाधिकार्‍यांचा ताफा जळगाव शहरात रात्री उशिरापर्यंत जळगाव शहरात पोहोचणार असल्याचे नाथाभाउंचे कट्टर समर्थक तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगीतले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शनिवारी सकाळी जळगावकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

नाथाभाऊंचे ठिकठिकाणी पुष्पगुच्छ, फुलांचे हार देवून स्वागत करण्यात येत होते. त्यामुळे जळगावात येण्यास उशिर झाल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून विजयादशमीला नाथाभाऊंचा सत्कार करण्यात येणार आहेे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com