जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींपैकी 92 ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत 787 ग्रा. पं. निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

ग्रामस्थरावर होणार्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान या निवडणुकीत आम्हीच नंबर वन किंवा जिल्ह्यात आमचाच बोलबाला असल्याचे दावे- प्रतिदावे जिल्ह्याती राजकीय नेत्यांनी केले.

जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले तर जळगाव जिल्हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचा दावा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला.

एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे भाजप अशी लढत असतांना जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढल्याचे आ. राजूमामा भोळे म्हणाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळेच राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील तर जिल्ह्यात आनंद वाटावा ऐवढे यश काँग्रेसला मिळाले असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदिप पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात शिवसेनेचाच भगवा फडकल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी केला.

ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे वर्चस्व - पालकमंत्री

ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे एकप्रकारे जनतेने सरकारच्या कामावर विश्वास दाखविला आहे. सरकारने जनतेच्या गावपातळीवरील कामांवर लक्ष केंद्रित केले.

त्यामुळे जनतेला हे सरकार आपले वाटते. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून यापुढे ग्रामीण भागात आमची सत्ता अबाधित राहणार.

जिल्ह्यात तर भाजप नावापुरता, काही गावांपुरता उरला आहे. राज्यभर शिवसेनेने मजबुती आघाडी घेतल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.ग्रामीण भागातील जनता महाविकास आघाडीवर नाराज- आ. गिरीश महाजन जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला राहीला असल्याचे आज लागलेल्या निकालांनी स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील 375 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाने झेंडा फडकविला असून आजही ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास भाजपावरच आहे. जामनेर तालुक्यात तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील जनता ही महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहे. खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्याचा कुठेही फरक पडला नसल्याचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी सांगितले.

नाथाभाऊंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली - अॅड. रविंद्रभैय्या पाटील

सव्वा वर्षातच जनतेला महाविकास आघाडीचे सरकार आपलेसे वाटत आहे. सरकारने केलेली कर्जमाफी, शेतीविषयक धोरणे, गावपातळीवरील कामांमुळेच जनतेने विचारपूर्वक मतदान केले.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असून ती ग्रामीण भागातील निवडणुकांच्या माध्यमातुन दिसून आली आहे. जिल्ह्यातील 75 टक्के ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी केला आहे.

एकटे लढून सिद्ध केली भाजपाने आपली ताकद - आ. राजूमामा भोळे

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविला आहे. जिल्ह्यातील 370 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिघांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुक लढविली. असे असले तरी भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकविला असल्याने त्यांनी आपली ताकद सिद्ध केली असल्याचे प्रतिक्रीया भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात भगवा फक्त शिवसेनेचाच- गुलाबराव वाघ

राज्यात ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या कामांचा परिपाक म्हणून जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जळगाव विभागात जळगाव तालुक्यात 27, पाचोरा 51, भडगाव 18, एरंडोल 20,

पारोळा 28, अमळनेर 6, धरणगाव 25, चाळीसगाव 8 असे एकुण 183 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर 87 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आसल्याची प्रतिक्रीया गुलाबराव वाघ यांनी दिली.

आनंद वाटावा ऐवढे यश- अॅड. संदिप पाटील

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने काही ठिकाणी स्वत:चे पॅनलवर तर काही ठिकाणी आम्ही आघाडी करून लढलो.

काँग्रेसपक्षाच्या सर्वच नेत्यांनी निवडणुक काळात बैठका घेऊन काँग्रेसचे उमेदवार निवडुन आणण्यासंदर्भात रणनिती आखली होती. त्यानुसार आम्हाला आनंद वाटावा असे यश मिळविला असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी केला.