Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयगळती रोखण्यासाठी भाजपाकडून उपाय योजनांना सुरुवात

गळती रोखण्यासाठी भाजपाकडून उपाय योजनांना सुरुवात

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने धास्तावलेल्या भाजपाच्या नेत्यांनी

- Advertisement -

गळती रोखण्यासाठी मंगळवारी तातडीची कोअर कमिटीची बैठक घेवून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले. या बैठकीला खासदार रक्षा खडसे मात्र अनुपस्थित होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक, माजीमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजन पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील आदींची उपस्थिती होती.

या बैठकीनंतर माजीमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती.

महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी हो बैठक घेतली.

त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

रक्षा खडसे पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत

बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता, गिरीश महाजन म्हणाले की, रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत.

त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असल्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत भूमिका मांडताना गिरीश महाजन म्हणाले की, भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे.

हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो.

एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, या विषयासंदर्भात सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या बैठका सुरू आहेत, विचारविनिमय देखील केला जात आहे. परंतु, कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णयापर्यंत सरकार पोहचत नाहीये. त्यामुळे या विषयात दिरंगाई होत आहे.

आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नसल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे काही नोकर भरती देखील रखडल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विशेष समिती स्थापन केली होती.

पाच सदस्यांच्या समितीने अभ्यासपूर्ण नियोजन केलेले होते. एकही मुद्दा आमच्या नजरेतून सुटलेला नव्हता. मात्र, पुढे दुर्दैवाने आमचे सरकार गेले. उच्च न्यायालयात आम्ही आरक्षण टिकवले.

पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्याठिकाणी आरक्षणाला स्थगिती मिळाली. सरकारला गांभीर्य नाही, त्यांचे नेते आणि मंत्र्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर दुमत आहे. अतिशय नियमांमध्ये बसून आरक्षण दिलेले होते.

पण तीन पायाच्या शर्यतीसारख्या चालणार्‍या सरकारच्या दिरंगाईमुळे या विषयाचा खेळखंडोबा झाला आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या