Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदेंच्या शब्दाला किंमत नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मुख्यमंत्री शिंदेंच्या शब्दाला किंमत नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मुंबई | प्रतिनिधी

भाजपने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली, पण ते आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपने सुरु केले असून त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या सर्व समाजामध्ये भाजपविरोधात प्रचंड मोठा आक्रोश आहे. पण सरकारला जनभावना समजत नाहीत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही. त्यांच्या शब्दाला किंमत नाही, त्यामुळे ते काय आरक्षण देणार? असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी राज्य सरकारवर टीका केली. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार घालवल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. जरांगे -पाटील यांना  पुन्हा उपोषण करावे लागत आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार हे खोटे बोलून सत्तेत आलेले सरकार आहे. आज महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी असा वाद सत्ताधारी जाणीवपूर्वक निर्माण करू पहात आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.

महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज ९ वर्ष झाली काय झाले त्या आश्वासनाचे? “सत्ता द्या एका महिन्यात मराठा आरक्षण देतो आणि मराठा आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो” अशी गर्जना राणा भीमदेवी थाटात फडणवीस यांनीच केली होती.

पुन्हा सत्तेत येऊन दीड वर्ष झाली, फडणविसांना त्याचाही विसर पडला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत या सरकारने फसवणूक केली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. लोकप्रतिनिधींविना स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासक चालवत आहेत त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. आरक्षण मिळावे ही अनेक समाजाची मागणी आहे, त्यांच्या मागणीला न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हटले आहे. पण शिंदे यांच्या शब्दावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळानेच जरांगे-पाटील यांना शब्द दिला होता, त्याचे काय झाले ते आज दिसतच आहे. एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा स्वतःच्या खुर्चीची जास्त चिंता आहे. त्यामुळे ते आरक्षण देण्याबाबत काही करतील असे दिसत नाही, असेही पटोले म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या