Friday, April 26, 2024
Homeराजकीय'सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच'

‘सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच’

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे माजी सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यात करोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्याच्या निधनामुळे काँग्रेस नेत्यांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की, “काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली.”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले की, त्यांनी अनेक वर्षे जनतेची सेवा केली. तल्लख बुद्धीसाठी ते ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाला मजबूत बनविण्यामध्ये त्यांची भूमिका होती, ती नेहमी लक्षात ठेवली जाईल. त्यांचा मुलगा फैजल यांच्याशी फोनवर बोललो. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो.

अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९७७ मध्ये अवघ्या २६ वर्षी ते भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते. कायम पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अहमद पटेल यांचं पक्षामध्ये मोठं वजन होते. गांधी कुटुंबांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचं नावं घेतलं जायचं.

- Advertisment -

ताज्या बातम्या