मुंबई | Mumbai

देशभरात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलेले ट्विट खूपच चर्चिले गेले. सचिनच्या या भूमिकेनंतर त्याला ट्रोल करण्यात आले. तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

केरळमध्ये तर सचिनच्या ट्विटनंतर आक्रमक झालेल्या युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटवर काळे तेल ओतून आपला निषेध नोंदवला. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा झाली आहे.” असा घणाघात देखील चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर केला आहे.

“एकदा केरळ येथील युवक कॉंग्रेसने बीफ बॅनविरुद्ध आंदोलन करत असताना गौमातेला भर रस्त्यात कापून टाकल्याचे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो!” असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच "आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता,पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात,ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल.हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही,तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे." असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

सचिन तेंडुलकरने काय म्हटलं होतं?

सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया."

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले होते. गायिका रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत ट्वीट केले होते. जागतिक सेलिब्रिटींनी हा विषय उपस्थित केल्यानंतर देशातून याला विरोध होत आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरसह सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी ट्वीट करत हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणत या सेलिब्रिटींनी विरोध केला होता.