जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळापाठोपाठ आता जिल्हा परिषदेमधील शालेय पोषण आहार घोटाळ्याची पुणे आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना दिेलेल्या निवेदनात खडसे यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्या अंतर्गत भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जळगाव या चार तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेची माहे जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत धान्यदीमाल व तांदूळाचा पुरवठा करण्यात आलेली देयके ही मुख्याध्यापक यांच्या शाळा स्तरावरील साठा नोंदवहीनुसार तपासणी कामी आदेश क्र.आरआर/28/2018, दि. 6 फेब्रुवारी 2018 रोजी तपासणी समितीची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदर समितीच्या संदर्भीय पत्र क्र.2 च्या वस्तुनिष्ठ अभिप्रायमध्ये अनुक्रमांक 5मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की,धान्यादी मालाच्या पावत्यानुसार मुख्याध्यापकांनी उतरवून न घेतलेला धान्यादी माल देयकात का दाखविण्यात आला?

याबाबत पुरवठादाराचे म्हणणे काय? ते नोंदविण्यात आलेले नाही. यारुन या समितीचे स्पष्ट मत दिसत आहे की, शाळास्तरावर मुख्याध्यापकांना सदरचा माल हा प्राप्त न होता देखील सदरच्या धान्यादी मालाच्या पावत्या या देयकामध्ये सादर करुन संबंधित तालुकास्तरावरील अधिकारी व जिल्हास्तरावरील अधिकारी यांनी पुरवठादाराशी संगनमत य आर्थिक व्यवहार करुन सदरची देयके अदा केलेली आहेत.

तसेच वस्तुनिष्ठ अभिप्रायमध्ये अनुक्रमांक 6 मध्ये देखील स्पष्टपणे म्हटले आहे की, सदर 21 शाळांच्या मुख्याध्यापकांनी धान्यादी माल व तांदूळ न उतरविता पावत्यांवर गोल करुन परत केला असताना संबंधित गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार योजना अधीक्षक यांनी त्यांची तपासणी न करता देयकांवर स्वाक्षरी केलेली आढळून येत आहे.

शाळास्तरावर मुख्याध्यापकांना माल प्राप्त न होता सदरच्या पावत्या या देयकात सादर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच सदर मुख्याध्यापकांचे बनावट शिक्के व खोट्या स्वाक्षर्या करुन संबंधित पुरवठादार याने तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील अधिकार्यांशी संगनमत व आर्थिक देवाण-घेवाण करुन शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली आहे.

तसेच अतिप्रदान झालेली रककम 1लाख 67 हजार 014 रु. मे. साई मार्केटींग ऍन्ड कंपनी, पाळधी, ता.धरणगाव या पुरवठादार यांचेकडून वसुलीस पात्र आहे.

संबंधित पुरवठादाराला वाचविण्यासाठी व कायदेशीर गुन्हा दाखल होऊ न देण्यासाठी सदर अभिप्रायमध्ये अपहार केलेल्या रक्कमेला अतिप्रदान या शब्दाची व्याख्या देवून पुरवठादारास वाचविण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे.

या शालेय पोषण आहार प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, असे निवेदन एकनाथराव खडसे यांनी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन दिले.