फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करा

मुंबई । प्रतिनिधी

फडणवीस सरकारच्या काळात म्हणजे २०१६-१७ मध्ये फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता असा आरोप करत याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा आणि अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते, असा दावाही पटोले यांनी केला.

फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय आणि अश्लाष्य प्रकार करण्यात आला. फोन टॅपिंग करताना बनावट नावे आणि पत्ते दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता? असे सवाल नाना पटोले यांनी केले आहेत.

फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे. तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधित होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com