औद्योगिक निर्देशांकातून समजणार उद्योग वाढीचा कल

उद्योग विभागाच्या नव्या वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
औद्योगिक निर्देशांकातून समजणार उद्योग वाढीचा कल

मुंबई / प्रतिनिधी
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे केले.

नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी महासंचालनालय तसेच उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना पवार यांनी राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

उद्योग क्षेत्र हे देशाच्या सकल उत्पन्नात महत्वाची भूमीका बजावणारे आणि सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करणारे महत्वाचे साधन आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढताना या निर्देशांकाचा उपयोग होतो. या निर्देशांकाचा उपयोग करुन आपण राज्यासाठी प्रभावी धोरण आखू आणि राबवू शकणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या धोरणांचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे. याचा उपयोग शासनाबरोबरच, उद्योग आणि या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्थांना होणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

राज्याच्या उद्योग क्षेत्राची प्रगती समजण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक निर्देशांक वेबसाईटचा मोठा उपयोग होणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राचे निश्चित स्थान आपल्याला समजणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे उद्योग विभागाचे अधिकारी आवश्यक माहिती या वेब पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम करणार आहेत. उद्योग क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि उत्पादनांच्या नियोजनासाठी ही वेब पोर्टल उपयुक्त ठरेल, असेही देसाई म्हणाले.

यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे (व्हिसीद्वारे), नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com