
इंदोर | Indore
भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
प्रियांका गांधी यांनी काय केले आरोप?
प्रियंका गांधी यांनी ट्विट करत दावा केला होता की, मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या एका संघटनेने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली होती की, त्यांना पैशांची मागणी केली जाते. ५० टक्के कमिशन दिले तरच आमच्या कामाचे पैसे दिले जातात. कर्नाटकमधील याआधीचे भ्रष्ट भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेते होते. मध्य प्रदेशात मात्र भाजपने स्वतःच्या भ्रष्टाचाराचा विक्रम मोडीत काढला आहे. कर्नाटकच्या जनतेने ४० टक्के कमिशनचे सरकार हटवले, आता मध्य प्रदेशात प्रदेशातील जनता ५० टक्के कमिशन देऊन सरकार हटवायला तयार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी या प्रकरणाबाबत प्रियांका गांधी यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यांचे आरोप खोटे असल्याचे सांगून, मध्ये प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी त्यांच्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस नेत्याकडून पुरावे मागितले होते. राज्य सरकारसमोर कारवाईचे पर्याय खुले आहेत, असा इशाराही दिला होता.