मुंबई | Mumbai

एकीकडे केंद्राने बनवलेले कृषी कायद्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षातील चार सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. एकीकडे चाचपडत असलेली काँग्रेस आणि दुसरीकडे देशातील इतर प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याची चिन्ह आहेत.

विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे. दरम्यान, हे वृत्त पसरताच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी म्हंटल आहे की, "पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?...पवारांच्या डिक्शनरीत विश्वासघाताला चमत्कार म्हणतात, हे केवळ जाणते पवारच करू जाणे, भाजपावाल्याना हे 'कौशल्य' जमायचं नाही." अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

कितीही जण एकत्र आले तरी उपयोग नाही - सुधीर मुनगंटीवार

“यूपीएचे अध्यक्ष कोण व्हावं, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्यावर भाजपला भाष्य करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करत आहे. कोणीही कितीही सत्याची भूमिका घेतली तरी जनता साथ देईल, असं वाटत नाही. जो काम करतो, राष्ट्रहितासाठी सर्वस्व पणाला लावतो, ज्याला परिवाराची चिंता नसते, तो नेता देशाला हवा आहे. कितीही जण एकत्र आले तरी उपयोग नाही. त्यांना इंजिनची क्षमता वाढवावी लागेल. जे पक्ष एकजूट करत आहेत, ते आपापल्या भागात जनतेच्या नजरेतून उतरले आहेत. महाराष्ट्रातही विश्वासघाताची मोट बांधून सरकार स्थापन केलं. धोका निर्माण करणे म्हणजे पराक्रम नाही” अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्याकडे येणार असल्याची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा सुरू

झाली आहे. 2004 पासून हे पद सोनिया गांधीकडे असून येत्या काही दिवसांमध्ये पवारांकडे या पदाची सूत्र सोपविण्याची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष हा यूपीएमध्ये दुय्यम पक्षाकडे वाटचाल करतो आहे का? आणि राहुल गांधी हे यूपीएचे नेतृत्व करण्यास सक्षम नाहीत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार 80 वर्षांत पदार्पण करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात पवार मयूपीएफचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शरद पवार हे विरोधी पक्षांचे नेते म्हणून नावारुपास आले आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधली. शिवाय दिल्लीच्या राजकारणातही त्यांचा दबदबा आहे. अशा परिस्थितीत यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्र पवारांकडे येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पवारांकडे यूपीएफचे अध्यक्षपद आल्यास काँग्रेसच्या एकूणच पक्षनेतृत्व आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. खास करुन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. पवार यांची राजकीय पार्श्वभूमी, अनुभव आणि राजकारणातील वजन पाहता यापूर्वीच त्यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद येणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता गेल्या कित्येक वर्षांपासून हे पद काँग्रेसकडेच आहे. परंतु, गेल्या सहा वर्षांमधील काँग्रेसची राजकारणात झालेली अधोगती पाहता यूपीएच्या अध्यक्षपदी दुसर्या पक्षाचा नेता येण्याची शक्यता होती. जी आता खरी ठरण्याचा कयास बांधण्यात येतो आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न युपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. मात्र, युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना संधी मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान महाविकास आघाडीनं 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात अशीही चर्चा आहे.