दिल्ली l Delhi

बिहार निवडणुकीत नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडपेक्षा (JDU) जास्त जागा मिळवत भाजपा मोठा भाऊ ठरला होता. पण, त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न सांगता ते नितीश कुमारांकडे सोपवले. पण, भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीश कुमार यांच्या सहा आमदारांना फोडलं आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

बिहारमध्ये सत्तेसाठी 'जनता दल युनायटेड' आणि 'भारतीय जनता पक्षा'नं युती केलीय. अरुणाचल प्रदेशात मात्र भाजपनं जदयूचे सहा आमदार आपल्याकडे खेचून घेतलेत. अरुणाचल प्रदेशात नितीश कुमार यांच्या पक्षाचे सात आमदार निवडून आले होते जे भाजप सरकारचं समर्थन करत आहेत. जेडीयूच्या पक्ष सोडलेल्या आमदारांमध्ये हायेंग मंगफी, जिक्के टाको, डोंगरु सिओंजू, तलेम तबोह, कँगगोंग ताकू आणि डोर्जी वंगडी खर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय, पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

शनिवारी पाटण्यात जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. इथे जदयूचे हे आमदार सहभागीही होणार होते. जदयूकडून आपल्या आमदारांच्या राहण्या-खाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, आता या आमदारांनी जदयूला डच्चू देत भाजपमध्ये प्रवेश मिळवलाय. इतर पक्षांचे नेते आपल्याकडे खेचताना सहयोगी आणि विरोधी असा भेदभाव भाजपकडून केला जात नसल्याचंच हे उदाहरण आहे.