अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई | Mumbai

राज्यात राजकीय घडामोडी सुरु असताना ठाकरे घराण्यातील आणखी एका ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे राज्यप्रमुख अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

अमित राज ठाकरे हे (amit raj thackeray) संघटना बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते. ठाकरे-शिंदे गट, भाजप-शिंदे गटाची युती, मुंबई महापालिका निवडणूक, मनसेचे भोंगे आंदोलन, सध्याचे राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं.

शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे आता भाजपला मनसेची गरज नाही असं वाटतं का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर "असं काही नाही. आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करतो. लोकांपर्यंत पोहोचतो. कोणत्या पक्षाला कुणाची गरज आहे हे सांगता येणार नाही. मात्र महाराष्ट्राला आता राजसाहेबांची गरज आहे हे मला माहित आहे. आम्ही आता स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. युती करायची की नाही, हा निर्णय राजसाहेब घेतील. गरज पडली तर मीसुद्धा निवडणूक लढवू शकतो. यापुढे ग्रामपंचायत निवडणूक असो की विधानसभा, प्रत्येक ठिकाणी मी प्रचारासाठी जाणार आहे," असं उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं.

खरी शिवसेना कुणाची, यावरुन राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, हा मुद्दा न्यायालयात आहे. याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, "बाळासाहेबांसाठी वाईट वाटले. बाकी कुणासाठी काही वाटले नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो. दसरा मेळावादेखील पाहायला मी गेलो नाही. जनतेकडून आम्हाला मिळणारे प्रेम बघून डोळ्यांत पाणी येतं,"

ठाकरेंनी एकत्र यावे असे वाटते का? यावर ते म्हणाले, "का वाटावे? आम्ही आमचे काम करतो आहोत. मध्ये काही काळ साडेसाती की काय असावी. मात्र आता तो काळ संपला आहे. प्रत्येक पक्षाचा बॅड पॅच असतो. याच काळात माझ्यावर पक्षाची जबाबदारी आली. त्यामुळे वाईट परिस्थितीतच खरे शिकायला मिळते,"

मनसेनं सुरु केलेले भोंगे आंदोलन सध्या थंड पडले आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आमचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. आम्हाला सरकारला जागे करायचे होते ते आम्ही केले. आता हा प्रश्न सरकारला विचारा. त्यांचे भोंगे कधी बंद करणार की आमच्या भोंग्यांना परवानगी देणार?"

अमित ठाकरे हे ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नंतर राजकारणात आलेले तरुण नेते आहेत. युवा पिढीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबद्दल मोठी क्रेझ आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com