‘मी तुम्हाला सांगितले होते…’; सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंग यांचे ट्विट

‘मी तुम्हाला सांगितले होते…’; सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंग यांचे ट्विट

दिल्ली | Delhi

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर पडदा पडल्याचं वाटत असतानाच आता मोठा भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot singh sidhu)यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात चरणजीतसिंग चन्नी (charanjit singh channi)यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे.

सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होत. ते (सिद्धू) स्थिर राहू शकत नाहीत. त्यांच्या याच स्वभावामुळे ते पंजाबसारख्या सीमेवर वसलेल्या राज्यासाठी योग्य नाहीत.' असं ट्विट अमरिंदर सिंग यांनी पक्षनेतृत्वाला उद्देशून केलं आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षनेतृत्वाने काही महिन्यांपूर्वीच सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते. तसेच दोन्ही नेत्यांतील वाद मिटला असल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केलं होत. मात्र यानंतर देखील सिद्धू व अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडत होते. अखेर पक्षनेतृत्वाने अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेत चाणजित सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. अशातच आज सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपविला आहे.

दरम्यान, अमरिंदर सिंग थोड्याच वेळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आता सारे लक्ष अमरिंदर सिंग यांच्या भूमिकेकडे लागले आहे. देशभरात भाजपचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. भाजपतील वादामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची विकेट काढली. यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपत प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

Related Stories

No stories found.