गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । प्रतिनिधी

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

राजकीय आशिर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याची टीकाही पाटील यांनी केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी भाजपने आवाज उठवला त्यावेळी सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत होते. पण आता एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलीसच उद्योगपतीला धमकी देण्यासाठी स्फोटके ठेवत असतील तर जनतेने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाल्याचे पाटील म्हणाले.

केवळ पोलीस अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करणे म्हणजे लोकांचा राग शांत करण्यासाठी केलेली किरकोळ उपाययोजना आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी सरकारने या प्रकरणात मूळापर्यंत जावे, अशी मागणी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *