आता निवडणुका घ्याच; पंकजा मुंडे यांचे आव्हान

आता निवडणुका घ्याच; पंकजा मुंडे यांचे आव्हान

बीड । वृत्तसंस्था

आता निवडणुका घ्याच, असे खणखणीत आव्हान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल दिले. कार्यकर्त्यांनो, कामाला लागा. तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ. येणार्‍या निवडणुकीला ताकदीनिशी सामोरे जा. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही मला कर्ज दिले ते कर्ज तुम्ही गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करून दिले. पालकमंत्री कुणी असो, मात्र मी तुमची पालक आहे, अशी साद पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना घातली.

बीड जिल्हा भाजप बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते संबोधित केले.

शिंदे सरकार निवडणुकीपासून लांब पळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून केला जात असून निवडणुका घेण्याचे आव्हान दिले जात आहे. त्या सुरात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही सूर मिसळत निवडणुका घेण्याबाबत आक्रमक विधान केले आहे.

पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान मोदी यांनी ङ्गसबका साथ, सबका विकास, सबका विश्वासफ ही त्रिसूत्री सांगितली. मोदी देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते देशातील प्रत्येक छोट्या-मोठ्या निवडणुकीच्या प्रचाराला जातात. जेव्हा ते प्रचाराला जातात तेव्हा ते संघटना म्हणून जात असतात. जेव्हा ते निर्णय घेतात तेव्हा ते देशाचा प्रथम नागरिक म्हणून निर्णय घेतात. असा नियम आमदार, खासदारांनादेखील असला पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेंना टोला

मुंडे साहेबांची कॉपी केल्याने मुंडे साहेब होता येत नाही. त्यांच्या विचाराचे अनुकरण करून वागणे म्हणजे मुंडे साहेब होणे, असे म्हणत नामोल्लेख न करता पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. राजकारण धर्माने करा. मात्र धर्माचे राजकारण करू नका. फंड-निधी यापेक्षा पुढे जाऊन राजकारण आहे, असेही त्या म्हणाल्या. मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोक जवळ आले, असा अविर्भाव आणू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com