‘टास्क फोर्स’च्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करणार - उदय सामंत

‘टास्क फोर्स’च्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करणार - उदय सामंत

पुणे |प्रतिनिधी|Pune

करोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे असतील तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी उदय सामंत यांनी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.

पुढील तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील

बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला असून, अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला आहे. मात्र, अद्याप सीईटीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची १९३ परीक्षा केंद्र ३५० पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यामुळे या पूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंदाजित तारखांमध्ये बदल करावा लागला, असे ते म्हणाले.

अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार

अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले. आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाही. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक विचार करुन आवश्यक ती मदत केली जाईल.

व्हिसा बाबत केंद्र सरकारच्या परवानगी बाबत चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले. महंमद अफगाणी यांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली. जेवण व निवासाची व्यवस्थेसाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती यावेळी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com