
मुंबई | Mumbai
गेल्या वर्षी शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटात फूट पडली आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळले. यावेळी घडलेल्या घडामोडींमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली असून कारवाईची मागणी केली आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर आजपासून सुनावणी सुरू झाली. यावेळी नेमकं काय घडलं यासंदर्भात शिंदे गटाच्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांना एकमेकांना याचिकेशी संबंधित कागदपत्र सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आल्याचे शिंदे गटाचे वकील अनिल सिंह यांनी सांगितलं आहे.
वकील अनिल सिंह म्हणाले की, आज सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात.
प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे, असं अनिल सिंग यांनी यावेळी सांगितले.