Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याहाफकिनसंबंधी ‘त्या’ वक्तव्याबाबत विचारताच तानाजी सावंत भडकले

हाफकिनसंबंधी ‘त्या’ वक्तव्याबाबत विचारताच तानाजी सावंत भडकले

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना आमदार म्हणून निवडून आलेले तानाजी सावंत हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. दरम्यान पुण्याच्या ससून रुग्णालयात औषधे वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला होता.

- Advertisement -

तेव्हा दौऱ्यात ‘हाफकीन’ या माणसाकडून औषधे घेऊच नका, असं राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हटल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. त्यावरुन सावंत यांची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडविण्यात आली. त्यावर काल सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सावंत यांना प्रश्न विचारल्यावर त्यांच्या चांगलाच पारा चढला.

‘हा सगळा मूर्खपणा आहे. मीडियाला किंवा इतरांना हे नवं सरकार आल्याचं पचत नाही आहे. तुम्हाला सर्वांना माझं शिक्षण माहिती आहे ना? उगाच ११-१२ वीचा पोरगा म्हणून ही दांडकी घेऊन फिरत नाही आहे. मी उच्चशिक्षित आहे. एकदा मी किती संस्था चालवतो, किती कारखाने चालवतो, किती कर्मचारी आहेत, किती दर्जेदार आहेत याची माहिती घ्या. मी काय तुम्हाला अंगठाछाप मंत्री वाटलो का?,’ अशी विचारणा तानाजी सावंत यांनी केली आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय दावा होत आहे?

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांचीही भेट घेतली. तानाजी सावंत यांनी यावेळी डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारले. रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, हाफकिनकडून वेळेत औषधं मिळत नसल्याची तक्रार डॉक्टरांनी केली. त्यावर तानाजी सावंत यांनी, ‘तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा’ असं म्हटलं. यानंतर पीएने त्यांना हाफकीन शासकीय संस्था असल्याचं सांगत सारवासारव केली असा दावा आहे. एका वृत्तपत्राने यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली आहे.

दरम्यान अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दौऱ्याचा तपशील पाहून अनेकांना हसू फुटले होते. दौऱ्याच्या कार्यक्रमात नमूद केल्याप्रमाणे तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहोचणार होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहतील.

तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यालयात जातील. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यालयात जातील. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जातील, असा एकंदरीत चमत्कारिक दौरा पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशा दौऱ्याने तानाजी सावंत यांची चांगलीच नाचक्की झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या